
About the Personality
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा आंबेडकरी विचारसरणीचे पालन करून चालणारा पक्ष आहे. बुद्ध-कबीर,शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सोबत घेऊन देशातील सर्व सामाजिक,आर्थिक,राजकीय दृष्ट्या वंचित घटकांचे एकत्रीकरण करून त्यांचा विकास करणे मुख्य हेतू आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा असा विश्वास आहे की, भारतात प्रामुख्याने दोन प्रकारच्या संस्कृती आणि परंपरा कार्यरत आहेत. त्यामधील एक समता आणि मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या संतांची परंपरा आणि दुसरा म्हणजे बहुजनांमध्ये असमानता आणि शोषण करणारी वैदिक परंपरा या दोन्ही परंपरा नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिल्या आहेत. संत परंपरेतूनच देशातील वंचित,शोषित समाजाचे कल्याण होऊ शकते. त्यामुळेच वैदिक परंपरेविरुद्धच्या बहुजनांच्या या लढाईत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संत परंपरेचा पुरस्कार करतो. देशाची आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर असे दिसून येते की, राजकीय व्यवस्था पूर्णपणे भांडवलदारांच्या आणि काही विशिष्ट जातींच्या विशिष्ट कुटुंबांच्या ताब्यात आहे. देशातील वंचित,शोषित,बहुजन समाजांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याने या समूहांच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे मूळ राहिलेले आहे. या भांडवलदार विशेष घराण्यांशी वंचित,शोषित गट स्पर्धा करू शकत नाही. अनेक वंचित गट त्यांच्यातील मतभेद विसरून किंवा मिटवून एकत्र येऊन त्यांना नक्कीच खाली आणू शकतात. म्हणूनच देशातील सर्व वंचित,शोषित गटांना संघटित करून वंचित शोषित गटांना त्यांच्या स्वतंत्र ताकतीच्या बळावर प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा उद्देश आहे. आमचे प्रत्येक पाऊल हे पक्षाचा उद्देश साध्य करण्याच्या हेतूने टाकले जाते. अशा प्रकारे साध्य केलेल्या प्रतिनिधित्वाच्या बळावरच देशातील सर्व वंचित,शोषित समूहांच्या दुःखाचे निवारण होऊ शकते.असा विश्वास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला आहे. पक्षाच्या संबंधित युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन तयार करून त्यांना सामाजिक, राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रामुख्याने केला जातो. भविष्यात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आपल्या स्वतंत्र सामाजिक,राजकीय बळावर देशातील सर्व वंचित शोषित बहुजन समूहांना खरे प्रतिनिधित्व मिळवून देईल.
पक्षाचा अजेंडा

- महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपून नवयुवकांना राजकीय,सामाजिक क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
- संविधानाचे रक्षण करणे.
- तरुण युवक,युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देणे.
- महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे.
- वंचित,शोषित,पीडितांना आधार देऊन आलुतेदार, बलुतेदारांना व बहुजन जाती घटकांना सत्तेच्या खुर्चीत बसवणे
- सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरुद्ध लढा देणे.
- लोकशाही,धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक उत्क्रांती घडवणे.